भूमिका
तोच रंगमंच ... तीच वेळ ... आणि ते प्रेक्षक ... एक प्रेक्षक म्हणून मनात एक हुरहूर प्रयोग सुरु होण्यापूर्वीची... ही हुरहूर जेवढी पडद्यामागच्या प्रत्येक कलाकाराच्या मनात असते ना प्रयोग सादर करण्यासाठीची तेवढीच ती प्रेक्षकांच्या मनातही असते एक अभूतपूर्व नाट्याविष्काराचे साक्षीदार होणार यासाठी. कुणीतरी अगदी खरं म्हणलय , तो रंगमंच, ती वेळ आणि ते प्रेक्षक पुन्हा येत नाहीत म्हणूनच नाटकाचा प्रयोग असतो , कारण प्रत्येक वेळी तो नवीन असतो. कलाकाराइतकाच तो प्रेक्षकाला सुद्धा प्रेक्षकांच्या भूमिकेतून समृद्ध करत असतो. एक नवीन अनुभूती देत असतो. तिसरी घंटा होते आणि अंधार होतो. ती घंटा म्हणजे एक नाद असतो , एक गजर असतो रंगदेवतेसाठी, मायबाप रसिकप्रेक्षकांसाठी , रंगमंचासाठी आणि कलाकारांसाठी. त्या घंटानादामुळेच तर वातावरण भारलं जात , तिथल्या अगदी सूक्ष्म कणांमध्ये सुद्धा नटराज अवतरतो. कारण आता सुरु होणार असतो एक यज्ञ ... त्या रंगमंचरुपी यज्ञकुंडात. कलाकार , पात्र एक एक समिधेची आहुती देणार असतात त्या यज्ञात. कारण तो अग्नी प्रज्वलित करून धगधगीत करायचा असतो कलाकाराला आणि आपल्याला सुद्धा. आपण असतो या अभूत...