अस्वस्थ निःशब्द पोकळी

कधी कधी ना आपल्याला सुद्धा कळत नाही की नेमकं काय होतंय आपल्याला. म्हणजे सगळं तर व्यवस्थित चालू असतं आणि काही घडेल अशी काही परिस्थिती सुद्धा नसते पण तरीही पोटात एक पोकळी तयार होतो. कसली तरी हुरहूर ... ती आपण शब्दात नाही व्यक्त करू शकत पण ती पोकळी असतेच... कारण पोटात पडलेला तो खड्डा अस्वस्थतेची जाणीव करून देत असतो. आपण बाहेरून दाखवत असतो कि सगळं तर नीट चाललंय , ते सुद्धा कुणाला दाखवतो स्वतःला. स्वतःच स्वतःला समजावण्याचा अयशस्वी प्रयत्न. पण अंगावर आलेला काटा , मनातली हुरहूर नाही ना लपवता येत. मग उगीचच कुढणं, लटकच का होईना रागावणं , चीड चीड करणं यातून ती पोकळी व्यक्त होते. आपलं आपल्याला सुद्धा कळत नाही हे असं का होतंय ते. पण आपलं शरीर कुठलीच भावना फार वेळ नाही लपवून ठेवू शकत. That's the beauty of nature .... शांत बसलं तरी ती पोकळी जाणवते .. खूप ओरडलं तरी ती असतेच... बोलावं म्हणलं तर चिडचिड होते आणि रडावं म्हणलं तर का रडावं याच कारण सापडत नाही. होतं असं कधी कधी. पण तीच आपल्याला फार अस्वस्थ करते. म्हणजे ना स्वच्छ चांदण्यांच्या आकाशात विनाकारण ढग जमा व्हावेत तसंच काहीतरी होत. मग आपण फक्त वाट पाहतो ते मळभ दूर होण्याची. कारण ते ढग ना बरसतात ना गडगडाटात ... फक्त आकाश आणि आपल्यात पोकळी निर्माण करतात. 
अशा वेळी ना फक्त वाट पाहावी मळभ दूर होण्याची. कुणाला तरी गच्चं मिठी मारावी. काहीही न बोलता. त्यानं सुद्धा निशब्द असावं. श्वासाची लय जाणवावी . एक आश्वासक स्पर्श व्हावा ... कदाचित दोन अश्रू गालावर ओघळतील.. वाट मोकळी करतील ते... पण ती पोकळी अलगद दूर होईल.. अगदी.. आपल्याला कळणार सुद्धा नाही ... आणि पुन्हा एकदा आपल्या ओठी हसू येईल... ते समाधान ... ते सुद्धा निशब्द पण स्वस्थ करणारं . यावेळी सुद्धा नाही शब्दात व्यक्त होणार या भावना. फक्त समाधान ओघळेल गालावरून... आपण फक्त हसायचं... आपलं मोकळं झालेलं निरभ्र अवकाश पाहायचं... पोकळी दूर झाल्याच्या समाधानात... 

                                                 अनिकेत जोशी 
                                                     (Software Engineering, Passionate Teacher and Theater Artist)

Comments