भूमिका
तोच रंगमंच ... तीच वेळ ... आणि ते प्रेक्षक ... एक प्रेक्षक म्हणून मनात एक हुरहूर प्रयोग सुरु होण्यापूर्वीची... ही हुरहूर जेवढी पडद्यामागच्या प्रत्येक कलाकाराच्या मनात असते ना प्रयोग सादर करण्यासाठीची तेवढीच ती प्रेक्षकांच्या मनातही असते एक अभूतपूर्व नाट्याविष्काराचे साक्षीदार होणार यासाठी. कुणीतरी अगदी खरं म्हणलय , तो रंगमंच, ती वेळ आणि ते प्रेक्षक पुन्हा येत नाहीत म्हणूनच नाटकाचा प्रयोग असतो , कारण प्रत्येक वेळी तो नवीन असतो. कलाकाराइतकाच तो प्रेक्षकाला सुद्धा प्रेक्षकांच्या भूमिकेतून समृद्ध करत असतो. एक नवीन अनुभूती देत असतो. तिसरी घंटा होते आणि अंधार होतो. ती घंटा म्हणजे एक नाद असतो , एक गजर असतो रंगदेवतेसाठी, मायबाप रसिकप्रेक्षकांसाठी , रंगमंचासाठी आणि कलाकारांसाठी. त्या घंटानादामुळेच तर वातावरण भारलं जात , तिथल्या अगदी सूक्ष्म कणांमध्ये सुद्धा नटराज अवतरतो. कारण आता सुरु होणार असतो एक यज्ञ ... त्या रंगमंचरुपी यज्ञकुंडात. कलाकार , पात्र एक एक समिधेची आहुती देणार असतात त्या यज्ञात. कारण तो अग्नी प्रज्वलित करून धगधगीत करायचा असतो कलाकाराला आणि आपल्याला सुद्धा. आपण असतो या अभूतपूर्व सोहळ्याचे यजमान.
परकायागमन ... म्हणजे आपलं अस्तित्वाचं भान ठेवून दुसऱ्या व्यक्तीला त्याच्या भूमिकेला आपल्या शरीरात काही काळापुरता प्रवेश करावा लागतो. आणि तेच परकायगमन एक प्रेक्षक म्हणून आपणही अनुभवतो. जसा अंधार होतो आणि पडदा वर जातो तेव्हा आपण आपलं अस्तित्व केव्हाच विसरलेलो असतो. लेखकाना त्याचा आत्मा संहितेत उतरवला असतो आणि दिग्दर्शक आकार देतो त्या आत्म्याला निराकार संहिता सगुण साकार करतो रंगमंचावर. समोरच्या कलाकाराचा प्रतिभासंपन्न अभिनय आपल्या नसानसात भिनतो आपल्याला त्या भूमिकेशी एकरूप करतो , नेपथ्यकाराचं चपखल नेपथ्य आपल्याला त्या स्थळावर आणि त्या काळात घेऊन जाते , प्रकाशयोजनाकाराचं मार्मिक प्रकाशयोजना त्या परिस्थितीची जाणीव करून देते , सुयोग्य असं संगीत आपल्या मनावर अधिराज्य गाजवण्या तयार असत आणि रंगभूषा आणि वेशभूषा यामुळेच तर आपण त्या पात्राशी एकरूप होतो , या सर्वांमुळे आपण त्या काळाचा, त्या भूमिकेचा एक भाग बनतो . एक अविभाज्य भाग. आपण स्वतःला त्या समोरच्या भूमिकेत ठेवून मोकळे झालेलो असतो. कधीकधी आपण इतके एकरूप होतो की भानावर यायला सुद्धा आपल्याला छोटासा धक्का बसावा लागतो.
हळूहळू पात्रांचे रंग गडद व्हायला लागतात. आणि आपल्या नसानसात सुद्धा तीच पात्र अवतरलेली असतात. अभिनयाच्या अत्युच्च जुगलबंदी पाहताना नकळत आपल्याही तोंडून दाद दिली जाते. ही दाद त्या कलाकाराच्या प्रतिभेला असते. आणि इथे आपलंही अस्तित्व कुठेतरी अबाधित असतं समोरच्या पात्राच्या अधीन असून सुद्धा. जशी जशी कथा पुढे सरकते, पात्र रंगू लागतात तसे तसे आपल्या मनी सुद्धा उत्कंठा वाढत असते. आपल्या मनात सुद्धा शक्य अशक्यतेचे खेळ सुरु असतात. तर्क लढवले जातात. हे द्वंद्वव असतं आपल्या विचारांचं. आपलं आणि भूमिकेचं . आपल्याही नकळत ते सुरु झालेलं असत. समोरची पात्र तोपर्यंत आपल्या नसा नसांमध्ये भिनलेली असतात, एकरूप झालेली असतात. आणि एका क्षणी हे द्वंद्वव थांबतं, पुर्णाहूर्ती दिली जाते आणि पडदा पडतो. आपण पुन्हा प्रेक्षकाच्या भूमिकेत परत येतो एक अभूतपूर्व प्रवास करून. एका समृद्ध नाट्याविष्काराचे , एका सोहळ्याचे साक्षीदार झालेलो असतो. एका अभूतपूर्व प्रयोगाचा अनुभव गाठीशी घेऊन त्या भारलेल्या वातावरणातून बाहेर पडतो. व्यक्ती तीच पण आपलीही भूमिका समृद्ध झालेली असते यातून... एका प्रेक्षकांची भूमिका... एक अनुभव परकायागमनाचा ...
अनिकेत जोशी
(Software Engineering, Passionate Teacher and Theater Artist)
Comments
Post a Comment